मुंबई|हिंदमाता एजन्सीज : - मुंबईत कलाप्रेमी आणि कला रसिकांसाठी एक अनोखा कलोत्सव आयोजित करण्यात आला आहे. इराइसा इंटरनॅशनल आर्ट्स आणि विंत्रा इवेंट्स आयोजित “आर्ट २०२६" हे कलाप्रदर्शन ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत द लीला गॅलरिया, अंधेरी पूर्व, मुंबई येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील प्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. विजय कदम व प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गिरीश वानखेडे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात अद्वैत बांदेकर, अंकिता भटनागर, बाबुदा कोल्ले, दगडू रणखांब, दिलीप माळी, गुरविंदर कौर, ॲड. प्रकाश नवाळे, प्रशांत साळुंखे, शिरीष जोगळेकर आणि डॉ. सुलोचना गावडे या दहा प्रतिभावान चित्रकारांचा समावेश असून मिश्र मीडिया, समकालीन कला आणि लँडस्केप आर्ट अशा विविध कलाप्रकार यात पाहायला मिळणार आहेत. सदर कला प्रदर्शनात कलारसिक, संग्राहक, मान्यवर आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना सहभागी कलाकारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना ईराइसा इंटरनॅशनल आर्ट्सचे संस्थापक व संचालक प्रविण गांगुर्डे यांनी सांगितले की, या प्रदर्शनाचा उद्देश प्रतिभावान कलाकारांना त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना कलारसिक व कला संग्राहकांशी थेट जोडणे हा आहे.
विंत्रा इवेंट्सचे संस्थापक व संचालक आशुतोष हडकर यांनी सांगितले की, या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध कलाशैली आणि कलाकृती एकाच छताखाली आणून कलाप्रेमींना एक समृद्ध आणि अनुभवात्मक कलादालन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनातून प्रेक्षकांना केवळ कलाकृती पाहण्याचीच नव्हे, तर आपल्या आवडीच्या आणि मनाला भावणाऱ्या मूळ कलाकृती जाणून घेऊन त्या संग्रहित करण्याची संधीही मिळणार आहे.
"आर्ट २०२६" हे केवळ एक कला प्रदर्शन नसून कलाकार, कला संग्राहक आणि कलारसिक यांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून साकारण्यात आले आहे. विविध कलाशैलींचा अनुभव घेताना कलाकारांची सर्जनशीलता, त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या कलाकृतींमागील भावविश्व जाणून घेण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे.

