Friday, 26 July 2024

आमदार थोरवेंनी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे कर्जतमध्ये पूराचे पाणी - सुधाकर घारे यांचा आरोप, बंधारा न काढल्यास आंदोलनाचा इशारा



कर्जत, दि. 26 जुलै, वार्ताहर:
गेले काही दिवस कर्जत परिसरात मुळसधार पाऊस पडत असून उल्हास नदी दुथडी भरुन वाहत आहे. बुधवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत शहरात पूराचे पाणी घुसले. आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून उल्हास नदीवर प्रतिपंढरपूर आळंदी परिसरात बांधलेल्या बंधाऱ्यामुळे कर्जत जलमय झाल्याचा आरोप करत हा बंधारा हटवण्यात यावा, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिला आहे.

गेले काही दिवस कर्जत परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, अशातच उल्हास नदीपात्राचे पाणी कर्जत शहरात घूसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. गुरुवारी कर्जत शहरातील पाण्याची पाहणी घारे यांनी केली, आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी माध्यमांशी बोलताना सुधाकर घारे म्हणाले, कोतवाल नगरला लागून उल्हास नदी आहे, येथे गेल्या काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकारातून नदीवर बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शहरात घुसले. कर्जत शहतून येणारे मुख्य गटाराच्या खालच्या बाजूला बंधारा बांधला आहे. या गटारातून येणारा कचरा, घाण बंधाऱ्यात साचून रोगराई देखील पसरण्याचा धोका आहे.

या बंधाऱ्यामुळे पूराचे पाणी शहरात घुसून नागरिकांचे मोठे नुकसान होते, त्यामुळे हा बंधारा पाडण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील घारे यांनी यावेळी दिला आहे.

चौकट :

बंधारा बाधणाऱ्यांवर कारवाई करा, घारेंची मागणी !

सुधाकर घारे म्हणाले, हा बंधारा नागरिकांची कोणतीही मागणी नसताना बांधला आहे. या बंधाऱ्यामुळे पूराचे पाणी गटारे नाल्यांमधून कर्जतमध्ये घूसते पुराचे पाणी घरात घुसले तर नागरिकांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा बंधारा मंजूर केला, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. येथे राहणाऱ्या गोरगरीब जनतेच्या घरात पाणी जावू नये याची दक्षता प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे असे देखील घारे यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment