Sunday, 13 October 2024

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांचे अद्वितीय सूक्ष्म कागद कात्रण कला प्रदर्शन,दि. १५ ते २१ ऑक्टोबर, २०२४ दरम्यान नेहरू सेंटर मध्ये







मुंबई (प्रतिनिधी):
 मुंबई स्थित आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकार, शास्त्रज्ञ, लिमका बूक ऑफ रेकॉर्ड धारक डॉ. महालक्ष्मी के. वानखेडकर यांच्या अद्वितीय अशा सूक्ष्म कागद कात्रण कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईत वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर कलादालनात दि. १५ ते २१ ऑक्टोबर, २०२४ या दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 

स्वत:च्या तल्लख मेंदूने आणि निपुण कलेने निसर्गाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या डॉ. महालक्ष्मी वानखेडकर ह्या जन्मजात निसर्गप्रेमी आहेत. त्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माजी विद्यार्थिनी आहेत त्या जंगल पक्षी आणि कीटक यांची अविश्वसनीय वास्तववादी आणि अद्वितीय 3D कागद कात्रण कला करतात. सध्याच्या प्रदर्शनात शृंगी घुबड, फ्लेमिंगो, पॅराडाईज, हमिंग किंगफिशर, हिमालयन मोनल, ग्रे पीकॉक, निकोबार कबूतर, फ्रूट डव्ह, मंडेरियन डक आणि विविध पक्ष्यांच्या अनेक कलाकृती पहायला मिळतील. 

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर यांनी साकारलेली सर्वात लहान कलाकृती ८ सेमी * १० सेमी आणि सर्वात मोठी ७० सेमी + १२० सेमी आहे. २००७ मध्ये चीनमध्ये झालेल्या जागतिक आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनात एअर इंडियाने त्यांना भारतातर्फे "भारतीय कला आणि संस्कृती" यासाठी प्रायोजित केले होते. २००५ मध्ये त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सूक्ष्म कागद कात्रण कला याचे प्रदर्शन आयोजित केले होते. २०१६ मध्ये "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने" त्यांच्या नावाची नोंद "क्वीन ऑफ टाइनी अँड मायक्रो कटिंग पेपर आर्ट इन बर्ड्स" करण्यात आली. 

साधारणपणे, शिल्पकलेची कल्पना करताना कागद हे अनुकूल माध्यम वाटत नाही, तरीही त्यांनी कागदी कलाकृती वास्तववादी बनविल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र कागदांवर विविध रंग, आकार आणि पोत यांच्या अद्भुत प्रक्रिया निर्मिती मधून निसर्गनिर्मित पक्षी व जंगल यामध्ये त्यांनी रूपांतरित केल्या आहेत. त्या एका इंचात जवळजवळ दीडशे कात्रण करतात. उत्कृष्ट कल्पना, सृजनशीलता आणि वास्तविकता यांचा अद्वितीय संगम त्यांच्या या कलाकृतींमध्ये दिसून येतो. 

डॉ. महालक्ष्मी यांना वास्तववादी कागद कलेमध्ये दुर्मिळ प्रतिभा आहे. निसर्गप्रेमी असल्याने  निसर्गाची ओढ आहेच आणि निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्यांच्या अथक प्रयत्नांमधील हा एक प्रयत्न सुरू आहे. एक कलाकार म्हणून काहीतरी अनन्य करण्याचे त्यांनी ध्येय ठेवले होते. त्यांनी त्यांच्या स्वप्नाचा पाठपुरावा केला आणि कागद कात्रण कलेला एक संपूर्ण नवीन आयाम आणि अत्याधुनिक धार दिली. त्यांच्या निर्मितीमध्ये निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांना असे वाटते की ती फक्त १ टक्का जुळू शकते. कारण हे विश्व, हा निसर्ग अद्भुत उर्जेने निर्माण झालेला आहे, ज्यात शास्त्र आणि अध्यात्म याचा संगम आहे आणि मानव तिथपर्यंत पोहोचू शकतच नाही. परंतु तरीही कागदातून जेव्हा या कलाकृती पूर्णत्वाला येतात तेव्हा एक आत्मिक समाधान होते. या कलाकृती खरंच अतुलनीय आहे. त्यांचा संयम आणि चिकाटी, त्यांच्या इच्छाशक्तीसह, त्यांना सर्वात लहान तपशील पूर्ण करण्यास प्रवृत्त करते. पेपर कटिंगमधील त्यांचे तपशील इतके अचूक आहेत की कागदाचा प्रत्येक स्ट्रँड केसांसारखा पातळ आहे. ही अचूकता त्यांनी तयार केलेल्या पक्ष्यांच्या पंखांमध्ये दिसून येते, ज्यामुळे ते जवळजवळ वास्तविक दिसतात.

कागदामध्ये स्वतःची उर्जा आणि जीवन आहे यावर विश्वास ठेवून त्या जे काही करतात ते नैसर्गिकरित्या होऊ देतात. प्रत्येकाला आपले सौंदर्य व्यक्त करण्याची मुभा आहे ते व्यक्त होऊ द्यावे आपण त्याच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करावा यावर त्यांचा विश्वास आहे. निसर्ग म्हणजे सर्व सजीव सृष्टीसाठी असणारे बूस्टर. या विश्वातील या पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हे पक्षी. जर हा मूळ घटक या सृष्टीत नसतील तर हे पंचतत्व पूर्णपणे ढासळेल त्याचे असंतुलन होईल म्हणून हे पक्षी संवर्धन आणि संरक्षण करणे आवश्यक आहे. यासाठी प्रेरित व्हावे आणि त्यातून निसर्गाशी जवळीक व्हावी म्हणून त्यांच्या प्रकल्पातील पक्ष्यांच्या या कलाकृतींची अद्वितीय निर्मिती केली आहे.

No comments:

Post a Comment